Type Here to Get Search Results !

संकटातही जेएनपीए अव्वल; सर्व कामगिरी निर्देशांकात विक्रमी कार्यक्षमता

 संकटातही जेएनपीए अव्वल; सर्व कामगिरी निर्देशांकात विक्रमी कार्यक्षमता




उरण (प्रतिनिधी पूजा चव्हाण ) : मध्यपूर्वेतील राजकीय अस्थिरता आणि जागतिक पुरवठा साखळीतील अनिश्चिततेच्या काळातही जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) सर्व प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशांकांमध्ये दमदार कामगिरी करत आपली कार्यक्षम स्थिरता कायम राखली आहे. पूर्वतयारी, संसाधनांचे काटेकोर नियोजन आणि सर्व भागधारकांशी असलेल्या घनिष्ठ समन्वयामुळे बंदरातील दैनंदिन कामकाज कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत सुरू आहे. जेएनपीएवरील आयात कंटेनरचा सरासरी थांबण्याचा कालावधी फेब्रुवारी 2026 मधील 25.17 तासांवरून मार्च 2026 मध्ये 22.68 तासांपर्यंत कमी झाला असून, यावरून माल हाताळणीतील गती आणि प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित झाल्याचे स्पष्ट होते. डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी (डीपीडी) आणि डायरेक्ट पोर्ट एन्ट्री (डीपीई) या उपक्रमांनी 2025-26 या आर्थिक वर्षात अनुक्रमे 74.57 टक्के आणि 45.74 टक्के कामगिरी नोंदवत मालाची जलद हालचाल आणि गर्दी कमी होण्यास मदत केली आहे. सध्याच्या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही जेएन पोर्टचा सरासरी जहाज टर्नअराउंड वेळ 22.61 तास इतका राखण्यात यश आले आहे. ट्रान्सशिपमेंट कंटेनर हाताळणीचे प्रमाण 5 टक्क्यांवरून 16 टक्क्यांपर्यंत वाढूनही कार्यक्षमतेच्या पातळीत कोणतीही तडजोड झालेली नाही. सध्या जेएन पोर्टमध्ये कंटेनर साठवण क्षमतेच्या फक्त 50 टक्के जागा वापरात असून उर्वरित 50 टक्के जागा रिकामी आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id -> uranshahar@gmail.com




 याशिवाय निर्यात कंटेनर साठवणुकीसाठी बंदर परिसरात आणखी 9.2 एकर अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि रीफर कंटेनरची वापरक्षमताही सुमारे 50 टक्के इतकीच आहे. या स्थिरतेमागे जेएनपीएने स्थापन केलेले समर्पित कार्यदल, टर्मिनल ऑपरेटर व सर्व हितधारकांशी असलेला सततचा समन्वय आणि ट्रॅक्टर ट्रेलरची 'बॅक टू टाऊन' वाहतूक, मालाची तात्पुरती पुनर्वाहतूक यांसारखे लक्ष्यीत उपाय कारणीभूत आहेत. एकूणच जागतिक बाजारात अस्थिरता असतानाही जेएनपीएने सर्व आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करून देशातील प्रमुख बंदर म्हणून आपला दर्जा पुन्हा सिद्ध केला आहे.

Post a Comment

0 Comments