उरण जेएनपीटी पोर्ट मार्गावर ऑईल टँकर पलटी; हजारो लिटर तेल रस्त्यावर, वाहतूक विस्कळीत
उरण, दि. ३ सचिन काजरोळकर,
उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्टकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर आज सकाळी १०:४० दरम्यान मोठा अपघात घडला. पियूपी बिल्डिंग परिसरात तेलाने भरलेला एक ऑईल टँकर अचानक पलटी झाल्याने हजारो लिटर तेल रस्त्यावर सांडले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोर्टकडून जाणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.
घटनास्थळाजवळच इंडियन कस्टमचे कार्यालय असल्याने तसेच हा मार्ग जेएनपीटी पोर्टसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सांडलेल्या तेलामुळे रस्ता निसरडा झाला असून आणखी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना करत वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जेएनपीटी पोर्ट रोडवर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ, रस्त्यांवरील काही ठिकाणची दुरवस्था, वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी आणि वेगमर्यादेचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, हजारो लिटर तेल वाया गेल्याने आर्थिक नुकसान झाले असून पर्यावरणीय परिणामांचाही प्रश्न उपस्थित होत आहे. तेल रस्त्यावर सांडल्याने परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षेचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित विभागांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पोर्ट रोडवर वारंवार अपघात होत आहेत. प्रत्येक वेळी केवळ तात्पुरती उपाययोजना केली जाते. एखाद्या दिवशी मोठी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनी या मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविणे, अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे आणि अपघातप्रवण ठिकाणांची तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


Post a Comment
0 Comments