केगावात बेकायदेशीर रिसॉर्ट्सच्या नावाखाली नशेच्या पार्ट्या; पोलिसांची धाड, गांजा जप्त – प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
( उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण यांसकडून )
उरण, दि. ४ :उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीर बांधकामांचा स्फोट झाला असून समुद्रकिनारी परवानगीशिवाय उभारलेल्या रिसॉर्ट्समध्ये रात्रीच्या अंधारात नशेच्या पार्ट्या रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरण व मोरा पोलिसांनी शनिवारी रात्री हॉटेल ओशियन पर्लच्या मोकळ्या मैदानात धाड टाकून एका २४ वर्षीय तरुणाला गांजा सेवन करताना रंगेहाथ पकडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी रात्री ११:२० वाजता केगाव दांडा येथील हॉटेल ओशियन पर्लच्या मोकळ्या मैदानात मोरा पोलीस ठाण्याचे सहा. पो. उपनिरीक्षक चंद्रकांत दत्तु तरे यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली. यावेळी यश रविंद्र घरत, वय २४, रा. केगाव अवेडा याला गांजाचे सेवन करताना पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध उरण पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १३१/२०२६ अन्वये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला भा.ना.सु.सं. ३५(३) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले. या कारवाईत वपोनि हनिफ मुलाणी, पोनि गुन्हे कावाणी व पथक सहभागी होते. प्राथमिक तपास स.पो.नि सतिश गोरे करत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, केगावच्या किनारपट्टीवर काही भांडवलदारांनी ग्रामपंचायत व इतर शासकीय विभागांची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर रिसॉर्ट्स उभारले आहेत. समुद्रात अनधिकृत भराव टाकून थेट भरतीच्या पाण्यातून बोटीने रिसॉर्टपर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या रिसॉर्ट्समध्ये रात्रीच्या वेळी नशेच्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये अंमली पदार्थांची उघड देवाणघेवाण होत असल्याचा आरोप आहे. 'व्हॉट्सअॅप'वरील लिंकद्वारे अशाच एका पार्टीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही धाड टाकली. मात्र, एवढ्या मोठ्या पार्टीत केवळ २ ग्रॅम गांजा जप्त होणे संशयास्पद असून, कारवाईच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी तक्रारी, वृत्तपत्रातील बातम्या व निवेदने देऊनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संतप्त आरोप स्थानिकांनी केला आहे. वरपर्यंत हात पोहोचल्याने भीतीपोटी कोणी उघड बोलायला तयार नाही. आज नशेच्या पार्ट्या, उद्या गुन्हेगारी टोळ्यांचे अड्डे बनण्याचा धोका असल्याने हा प्रश्न केवळ स्थानिक न राहता व्यापक सुरक्षेशी निगडित बनला आहे, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.
बेकायदेशीर बांधकामे, नशेच्या पार्ट्या व संशयास्पद हालचालींमुळे किनारपट्टी भागात गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई न केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांना जबाबदार कोण, असा सवाल उरणकर विचारत आहेत. या प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा जनतेचा रोष उसळेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


Post a Comment
0 Comments