उरणमध्ये २.७८ किलो गांजासह बिहारचा तस्कर जेरबंद; उरण पोलिसांची धडक कारवाई, आंतरराज्यीय रॅकेटचा तपास सुरू
उरण | प्रतिनिधी
अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात उरण पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत बिहारमधील एका संशयित तस्कराला तब्बल २ किलो ७८० ग्रॅम गांजासह रंगेहात अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत २ लाख ७८ हजार रुपये असून या कारवाईमुळे उरण परिसरात कार्यरत असलेल्या संभाव्य आंतरराज्यीय अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनीरूल अयनुल हक (वय ३९) असे असून तो मूळचा बिहार राज्यातील किशनगंज जिल्ह्यातील ईदलपूर गावचा रहिवासी आहे. सध्या तो नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केट परिसरातील एकतानगर झोपडपट्टी येथे राहत असून कांदा-बटाटा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा
दिनांक ८ मे रोजी सायंकाळी सुमारे ५.११ वाजण्याच्या सुमारास रिलायन्स रोडलगत डीआरटी ब्रिजजवळील दशमिश खालसा ढाबा परिसरात एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती उरण पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई बसवराज सकपाळ यांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांदवे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे, संजय राठोड आणि इतर पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयितावर नजर ठेवली. काही वेळातच संशयास्पद हालचाल करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पंचासमक्ष झडती घेण्यात आली. त्याच्या ताब्यातील प्लास्टिकच्या पिशवीत हिरवट-तपकिरी रंगाचा, उग्र वास असलेला, पाने, फुले, बिया व काड्या मिश्रित २ किलो ७८० ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा आढळून आला.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १३४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क) आणि २०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला रात्री ११.३० वाजता अधिकृतरीत्या अटक करण्यात आली असून अटकेची कारणे लेखी स्वरूपात त्याला देण्यात आली.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले २.७८ किलो गांजा हे “मध्यम मात्रा” श्रेणीत मोडते. या गुन्ह्यासाठी एनडीपीएस कायद्यानुसार १० वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपआयुक्त अमित काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायखे यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईची माहिती घेतली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी, पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे आणि संजय राठोड उपस्थित होते. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देत नमुने संकलित केले.
आंतरराज्यीय तस्करीचा संशय
आरोपीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कसा आला, तो कोणाकडून आणण्यात आला होता आणि कोणाला पुरवठा केला जाणार होता याचा सखोल तपास सुरू आहे. यामागे मोठे आंतरराज्यीय जाळे कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
‘झिरो टॉलरन्स’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई
उरण पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने अमली पदार्थांविरोधात सुरू केलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ मोहिमेंतर्गत उरण पोलिसांची ही आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.
याबाबत नागरिकांनी परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments