उरणच्या धाबेगिरीला कोणाचा आशीर्वाद?
रात्रभर दारू, धिंगाणा आणि अपघात; राज्य उत्पादन शुक्ल विभाग व FDA मात्र ‘गाढ झोपेत’!
उरण, दि. १० जून ( पुजा चव्हाण प्रतिनिधी) – उरणमध्ये रात्री अकरा वाजल्यानंतर कायदा झोपतो आणि बेकायदा धाबे जागे होतात, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. शहर आणि महामार्गालगत उभे राहिलेले अनेक चायनीज-बारवाले धाबे रात्रभर राजरोसपणे सुरू असतात. परवानगी, नियम आणि वेळेची बंधने यांना अक्षरशः केराची टोपली दाखवत येथे मद्यविक्री, धिंगाणा आणि संशयास्पद खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचा आरोप होत आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या धाब्यांमधून बाहेर पडणारे मद्यधुंद चालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. स्थानिकांच्या मते, अनेक निष्पाप नागरिकांना याची किंमत जीव गमावून किंवा गंभीर जखमी होऊन चुकवावी लागत आहे.
उरण पोलीस प्रशासनाने या धाब्यांविरोधात कारवाई सुरू ठेवली असल्याचे सांगितले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी गेल्या महिन्यात सात धाब्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल केल्याची माहिती दिली. रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांनी माहिती दिल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
उरण शहार , महाइंडिया २४
संपादक -सचिन काजरोळकर
मात्र नागरिकांचा रोष पोलीसांपेक्षा दारूबंदी विभाग आणि अन्न व औषध प्रशासनावर अधिक आहे. राज्यभर बेकायदा मद्यविक्री आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू असताना उरणमधील धाब्यांवर संबंधित विभागांचे अधिकारी का पोहोचत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
"उरण वेगळ्या राज्यात आहे का?"
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार विना परवाना मद्यविक्री हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे. तरीही काही धाब्यांमध्ये वर्षानुवर्षे खुलेआम दारू विक्री होत असल्याचा आरोप आहे. राज्यातील इतर भागांत अबकारी विभाग धडक कारवाया करत असताना उरणमध्ये मात्र संशयास्पद शांतता का आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
दुसरीकडे, FSSAI परवाना नसलेल्या छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासन उरणमधील धाब्यांवर विकल्या जाणाऱ्या चिकन, तंदूरी पदार्थ, चायनीज खाद्यपदार्थ आणि इतर खाद्यसाहित्याची तपासणी का करत नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांनी धाब्यांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली आहे.
अपघातांची धक्कादायक आकडेवारी
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, रात्री ११ ते पहाटे ३ या कालावधीत झालेल्या १२ अपघातांपैकी ८ अपघात मद्यप्राशनाशी संबंधित होते. त्यातील ६ अपघात हे धाब्यांच्या अवघ्या ५०० मीटर परिसरात घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या धाब्यांचा आणि वाढत्या अपघातांचा संबंध तपासण्याची मागणी जोर धरत आहे.
महिलांनीही धाब्यांबाहेर जमा होणाऱ्या मद्यधुंद टोळक्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. रात्री कामावरून घरी परतणाऱ्या महिला आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जाते.
नागरिकांचा इशारा
"पोलीस कारवाई करतात, पण धाबे दोन दिवस बंद राहून पुन्हा सुरू होतात. मग या धाब्यांना संरक्षण कोण देत आहे?" असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आता दारूबंदी विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून बेकायदा धाब्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी, अन्यथा नागरिकच रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
उरणकरांचे म्हणणे स्पष्ट आहे – कायद्याचा धाक सर्वांसाठी समान असेल तरच रस्ते सुरक्षित होतील; अन्यथा धाबेगिरी आणि अपघातांचे हे दुष्टचक्र थांबणार नाही....

.jpg)

Post a Comment
0 Comments