उरण तालुक्यातील द्रोणागिरी-फुंडा कॉलेज परिसरातील CNG पंपाविरोधात वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उरणच्या द्रोणागिरी-फुंडा कॉलेजजवळील CNG पंपावर ग्राहकांचा संताप; क्षमतेपेक्षा जास्त CNG भरल्याचा आरोप, प्रश्न विचारणाऱ्यांना दादागिरीची वागणूक? प्रशासनाकडून चौकशीची मागणी
उरण दि. ७ जुलै : सचिन काजरोळकर
उरण तालुक्यातील द्रोणागिरी-फुंडा कॉलेज परिसरातील CNG पंपाविरोधात वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रिक्षाचालक, चारचाकी वाहनधारक आणि नियमित ग्राहकांनी वाहनाच्या टाकीच्या क्षमतेपेक्षा अधिक CNG भरल्याचे बिल दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासोबतच या प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या ग्राहकांना पंपावरील डीलर आणि काही कर्मचाऱ्यांकडून उद्धट, अरेरावीची आणि दादागिरीची वागणूक मिळत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, रिक्षांमध्ये साधारणतः ₹१८० ते ₹२३० इतकीच CNG मावते. मात्र संबंधित पंपावर त्याच रिक्षेत तब्बल ₹550 पर्यंत CNG भरल्याचे बिल देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मीटरमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे का, की ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत.
याचप्रमाणे, एका चारचाकी वाहनधारकाने आपल्या वाहनात तब्बल ₹1,500 ची CNG भरल्याचा आरोप केला आहे. संबंधित वाहनाच्या टाकीची क्षमता पाहता एवढ्या रकमेची CNG भरणे शक्य नसल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे. या प्रकाराबाबत पंप व्यवस्थापनाकडे स्पष्टीकरण मागितले असता समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच
महा इंडिया न्युज ला संपर्क करा..
Mail id ->
uranshahar@gmail.com
सचिन काजरोळकर
ग्राहकांचा मुख्य प्रश्न असा आहे की, वाहनाच्या टाकीची निश्चित क्षमता असताना त्यापेक्षा अधिक CNG मीटरवर कशी दाखवली जाते? CNG डिस्पेन्सरचे कॅलिब्रेशन नियमित केले जाते का? मीटरची वजन व मोजमाप विभागाकडून नियमानुसार तपासणी होते का? संबंधित पेट्रोलियम कंपनीकडून वेळोवेळी ऑडिट केले जाते का? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
यापूर्वीही अनेक वाद; ग्राहकांचा आरोप
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा CNG पंप यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. काही ग्राहकांनी महिला कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळाल्याची तक्रार केली आहे. तर काहींनी कर्मचारी ड्युटीदरम्यान मोबाईलवर बोलताना किंवा गेम खेळताना दिसत असल्याचा आरोप केला आहे.
विशेष म्हणजे, ग्राहकांना सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल फोन वापरण्यास सक्त मनाई केली जाते. मात्र त्याच ठिकाणी कर्मचारी निर्धास्तपणे मोबाईल वापरत असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे नियम फक्त ग्राहकांसाठीच आहेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
"दोन पैसे जास्त देऊन निघून जा" अशी मानसिकता?
काही ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, वाद घालण्यापेक्षा दोन-चारशे रुपये जास्त गेले तरी शांतपणे निघून जाणेच अनेक जण पसंत करतात. कारण प्रश्न विचारल्यास अपमानास्पद वागणूक मिळते, अशी भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक जण मनात नाराजी ठेवूनही अधिकृत तक्रार करण्याचे टाळतात.
स्थानिकांच्या मते, जर अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असतील तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. अन्यथा सामान्य ग्राहकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो.
प्रशासनाने तातडीने तपासणी करण्याची मागणी
रिक्षाचालक, वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी वजन व मोजमाप विभाग, संबंधित पेट्रोलियम कंपनी, जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाने तातडीने या CNG पंपाची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.
त्यांच्या मागणीनुसार –
CNG डिस्पेन्सरचे कॅलिब्रेशन तपासण्यात यावे.
मीटरची अचूकता पडताळण्यात यावी.
CCTV फुटेजची तपासणी करण्यात यावी.
ग्राहकांच्या तक्रारींची नोंद घेऊन निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
नायब तहसीलदारांची प्रतिक्रिया-
या संदर्भात नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, "या प्रकरणाची माहिती घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडतो," अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींना दिली.
आता या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, संबंधित विभाग तपासणी करतात का आणि ग्राहकांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याकडे उरण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments