सेंट मेरी शाळेबाहेर वाहतूक कोंडीचा विळखा; प्रवासी आणि पालक त्रस्त
उरण प्रतिनिधी: उरण येथील सेंट मेरी शाळा भरताना आणि सुटताना शाळेबाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने विद्यार्थी, पालक तसेच उरणबाहेर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शाळा सुटण्याच्या वेळेत पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांमधून शाळेबाहेर येतात. मात्र, वाहनांसाठी शाळेच्या आवारात पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक पालकांना रस्त्याच्या कडेला अथवा गेटजवळ वाहने उभी करावी लागतात. परिणामी रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे, गेटजवळ वाहने अस्ताव्यस्त उभी राहत असल्याने एका पालकाला वाहन बाहेर काढताना दुसऱ्या वाहनाचा अडथळा निर्माण होतो. यामुळे पालकांमध्ये वाहन काढण्यावरून वादाचे प्रसंगही घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या वाहतूक कोंडीचा फटका केवळ शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनाच नव्हे, तर वाशी, बेलापूर, मुंबई आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांनाही बसत आहे. कोंडीमुळे बस किंवा इतर वाहनांना उशीर होत असून, काही प्रवाशांच्या रेल्वे गाड्याही चुकत असल्याच्या तक्रारी आहेत.
वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी
शाळा भरताना व सुटताना ठराविक वेळेत वाहतूक पोलिसांची किंवा वाहतूक व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तसेच शाळा प्रशासनाने पालकांच्या वाहनांसाठी नियोजित पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी पालक व प्रवासी वर्गातून होत आहे.
शाळा प्रशासन, वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जोर धरत आहे.


Post a Comment
0 Comments