Type Here to Get Search Results !

७ वर्षीय आदीचा नवा विक्रम! दोन्ही सख्ख्या भावांची १८ किलोमीटर समुद्री भरारी.

 डाउन सिंड्रोम असलेल्या पार्थची जिद्द, तर ७ वर्षीय आदीचा नवा विक्रम! दोन्ही सख्ख्या भावांची १८ किलोमीटर समुद्री भरारी.




पार्थने ६ तास ५७ मिनिटांत, तर आदीने अवघ्या ५ तास ५६ मिनिटांत पूर्ण केले एलिफंटा ते नागाव-पिरवाडी बीचचे आव्हान पूर्ण.


 आदी ठरला हा समुद्री मार्ग पूर्ण करणारा सर्वात लहान जलतरणपटू.



उरण दि. ३० (विठ्ठल ममताबादे)  जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर कोणतेही आव्हान अशक्य नसते, हे उरणमधील पार्थ निशांत पाटील आणि आदी निशांत पाटील या दोन सख्ख्या भावांनी आपल्या असामान्य कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. एलिफंटा लेणी (घारापुरी) ते नागाव-पिरवाडी बीच (उरण) असे सुमारे १८ किलोमीटरचे समुद्री अंतर पोहून पूर्ण करत या दोन्ही भावांनी क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, डाउन सिंड्रोम असलेल्या पार्थने हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले, तर अवघ्या सात वर्षांच्या आदीने हा समुद्री मार्ग पूर्ण करणारा सर्वात लहान जलतरणपटू ठरण्याचा मान मिळवला आहे .



पार्थ निशांत पाटील हा १३ वर्षांचा असून तो सीबर्ड स्पेशल स्कूल, उरण येथे शिक्षण घेत आहे. तर त्याचा लहान भाऊ आदी निशांत पाटील हा अवघ्या ७ वर्षांचा असून सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल, उरण येथे इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे. दोघांनाही लहानपणापासूनच पोहण्याची आवड निर्माण झाली. उरण येथील स्विमिंग पूलमध्ये त्यांनी पोहण्याचा सराव सुरू केला. नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे त्यांची पोहण्यातील आवड अधिक दृढ होत गेली.


शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २:३० वाजता दोन्ही भावांनी घारापुरी (एलिफंटा लेणी) येथून समुद्रात पोहण्यास सुरुवात केली. सुमारे १८ किलोमीटरचे हे आव्हानात्मक समुद्री अंतर पार्थने ६ तास ५७ मिनिटांत, तर आदीने अवघ्या ५ तास ५६ मिनिटांत पूर्ण करून नागाव-पिरवाडी बीच येथे यशस्वीरीत्या लक्ष्य गाठले.




या संपूर्ण मोहिमेत अवघ्या सात वर्षांच्या आदी निशांत पाटील याची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली. एवढ्या कमी वयात १८ किलोमीटरचा आव्हानात्मक समुद्री मार्ग पूर्ण करणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. आदीने केवळ ५ तास ५६ मिनिटांत हे अंतर पार करत आपल्या जलतरण कौशल्याची, धाडसाची आणि प्रचंड आत्मविश्वासाची चुणूक दाखवून दिली. या कामगिरीसह एलिफंटा लेणी ते नागाव-पिरवाडी बीच हा समुद्री मार्ग पूर्ण करणारा सर्वात लहान जलतरणपटू म्हणून आदीने विशेष ओळख निर्माण केली आहे. मोठ्या भावासोबत समुद्रातील हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करत आदीने उरणच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे.




दुसरीकडे, डाउन सिंड्रोम असलेल्या १३ वर्षीय पार्थची कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे. पार्थने तब्बल ६ तास ५७ मिनिटे समुद्रात सातत्याने पोहत १८ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. विशेष गरजा असलेल्या मुलांमध्येही अफाट क्षमता असते आणि योग्य प्रशिक्षण, संधी, प्रोत्साहन व कुटुंबाचा भक्कम आधार मिळाल्यास तेही उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, हा सकारात्मक संदेश पार्थने आपल्या कामगिरीतून समाजासमोर ठेवला आहे. डाउन सिंड्रोम असलेल्या विद्यार्थ्याने हा समुद्री मार्ग पूर्ण करण्याची ही महाराष्ट्रातील पहिली कामगिरी असल्याचे सांगितले जात आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी साप्ताहिक उरण शहर तसेच 

महा इंडिया न्युज ला संपर्क करा..

Mail id ->

 uranshahar@gmail.com

सचिन काजरोळकर




गेल्या सुमारे चार वर्षांपासून दोन्ही भावंडे पोहण्याच्या क्षेत्रात मेहनत घेत आहेत. उरण म्युनिसिपल कौन्सिल आणि महाराष्ट्र राज्य अमॅच्युअर ॲक्वॅटिक असोसिएशन यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून विविध स्पर्धांमध्ये पदकेही मिळवली आहेत. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी समुद्रातील लांब पल्ल्याचे पोहण्याचे आव्हान स्वीकारण्याची तयारी केली.

या आव्हानासाठी त्यांना सी-स्विमिंग कोच तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू संतोष पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्विमिंग पूलमध्ये कोच विजय बेहेरा यांनी त्यांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले. दोन्ही प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण सराव करत त्यांनी १८ किलोमीटरच्या समुद्री पोहण्याचे आव्हान पूर्ण केले. या मोहिमेत निरीक्षक म्हणून सुनील मयेकर आणि निल लब्दे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच विंडसर्फिंगमधील गोल्ड मेडलिस्ट राज पाटील आणि साई पाटील यांचेही सहकार्य लाभले.


या यशामागे पालकांचेही मोठे योगदान आहे. वडील निशांत पाटील हे कॉन्ट्रॅक्टर असून इलेक्ट्रिकल मेंटेनन्सचा व्यवसाय करतात. आई संपदा निशांत पाटील या मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. तसेच पतीच्या व्यवसायातही त्या सहकार्य करतात. मुलांच्या स्वप्नांना बळ देत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर दोघांनाही प्रोत्साहन दिले.




पार्थ आणि आदी या दोघांच्या कामगिरीतून वेगवेगळे प्रेरणादायी संदेश समाजासमोर आले आहेत. पार्थने विशेष मुलांमधील क्षमता आणि जिद्दीची ताकद दाखवून दिली, तर आदीने लहान वयातही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याची क्षमता सिद्ध केली. एकाच कुटुंबातील या दोन भावांनी एकाच दिवशी १८ किलोमीटरचे समुद्री आव्हान पूर्ण करणे ही उरणसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.


भविष्यात जलतरण क्षेत्रात आणखी प्रगती करून मोठ्या स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करायचे, असे स्वप्न या दोन्ही भावंडांनी उराशी बाळगले आहे.


पार्थ आणि आदी यांच्या या असामान्य कामगिरीमुळे उरणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जिद्द, मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर कोणतीही मर्यादा ओलांडता येते, हा प्रेरणादायी संदेश या दोन्ही भावांनी आपल्या कामगिरीतून दिला आहे.

Post a Comment

0 Comments